लाखाचे बारा हजार करायला लागलेल्यांना निवडून देणार काय : अजित पवार

इंदापूर : लाखाचे बारा हजार करायला लागलेल्यांना निवडून देणार काय अशी विचारणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज ( दि.२५) इंदापूरच्या मतदारांना केली.आ.दत्तात्रय भरणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजित करण्यात आलेल्या जाहिर सभेत ते बोलत होते.
आ.अमोल मिटकरी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर व इतर मान्यवर या सभेस उपस्थित होते. अफाट गर्दीत ही सभा पार पडली.
आपल्या अर्ध्या तासाच्या भाषणात अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्यावर घणाघाती टीका करत त्यांच्या कार्यपध्दतीचे अक्षरशः वाभाडे काढले. ते म्हणाले की,विधानसभेसारख्या निवडणूकीत आरोप प्रत्यारोप होतात.एक उमेदवार वीस वर्षे तुमचे प्रतिनिधित्व करणारा आहे.एक उमेदवार दहा वर्षे प्रतिनिधित्व करणारा आहे.एक उमेदवार अर्ज राहिला तर कोरी पाटी असणारा आहे.मागील दहा वर्षे आ. दत्तात्रय भरणे यांनी लोकप्रतिनिधी म्हणून तालुक्याचा कारभार पाहिला आहे. त्यामधील पाच वर्षात आमचे सरकार नव्हते.नंतरच्या पाच वर्षांपैकी दोन वर्षे वाया गेली.एक वर्ष सरकारमध्ये नव्हतो.एक वर्ष कोरोना होता. तरी ही नंतर मिळालेल्या तीन वर्षात आ.भरणे यांनी तालुक्याच्या विकासासाठी सहा हजार कोटी रुपयांचा निधी आणला आहे.
केंद्रात आपल्या विचाराचे सरकार आहे. भरपूर निधी आणता येईल. त्यासाठी राज्यात आपल्या विचाराचे सरकार येणे आवश्यक आहे.भाऊबीजेनंतर प्रचाराला सुरुवात होईल. काहींची उमेदवारी जाहीर करणे बाकी आहे.शनिवार रविवार ते काम पूर्ण होईल.नवे,जुने,मधल्या फळीतले अशा सर्वांना बरोबर घेवून महायुतीचे सरकार आणायचे आहे,असे पवार म्हणाले.
दिलेल्या संस्था तळहाताच्या फोडाप्रमाणे जपायच्या असतात. त्या चालवणा-या नेतृत्वाच्या अंगात धमक असावी लागते. दुधगंगा दुधसंघाची अवस्था काय आहे अशी विचारणा करत वाट लागली असे उत्तर पवार यांनी स्वतःच दिले. ते पुढे म्हणाले की, अमूल बंद पडला. दुधगंगा बंद पडला. शंकरराव पाटलांनी ताब्यात दिलेल्या बिनकर्जाच्या साखर कारखान्यावर पाचशे कोटी रुपयांचे कर्ज आहे. लाखाचे बारा हजार करायला लागलेल्यांना निवडून देणार काय अशी विचारणा पवार यांनी केली.
इंदापूर अर्बन बँक सलाईनवर आहे. शिक्षणसंस्थेची चौकशी लागली आहे.कर्तृत्व नाही कशाच्या गप्पा हाणता. तुम्हाला बँक चालवता येत नाही.राज्य सरकारच्या मागे लागून एनसीडीसीमधून आणलेल्या तीनशे कोटी रुपयांचे काय केले असा सवाल पवार यांनी उपस्थित केला.
लोकसभा निवडणुकीच्या काळात देवेंद्र फडणवीस यांच्या घरी बसलो असताना नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे.एकेक जागा महत्त्वाची आहे,त्यामुळे आत्ता तुम्ही सर्वजण काम करा,असे फडणवीस यांनी आम्हाला सांगितले. त्या वेळी इंदापूर विधानसभेचे काय असे हर्षवर्धन पाटील यांनी मला विचारले. त्यासंदर्भात आपण काही बोलणार नाही,असे मी सांगितल्यानंतर फडणवीस घेतील तो निर्णय आपण मान्य करु असे पाटील म्हणाले.त्यास मी संमती दिली,अशी माहिती पवार यांनी दिली.विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विधानपरिषदेच्या बारा जागांपैकी सात जागा आम्ही भरल्या. उरलेल्या पाचपैकी एका जागेवर पाटील यांना घ्यायचा निर्णय घेण्यात आल्याचे भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आपल्याला सांगितले होते.परंतू पाटील यांची थांबायची तयारीच नाही. लगेच त्यांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला.सारखेच दलबदलूपणा केल्यानंतर कोण तुमच्यावर विश्वास ठेवणार,अशी टिप्पणी पवार यांनी केली.
या वेळी आ. दत्तात्रय भरणे,दीपक काटे,बाळासाहेब सरवदे,संजय सोनवणे व इतरांची भाषणे झाली.त्यानंतर अजित पवार यांच्या उपस्थितीत आ.दत्तात्रय भरणे यांची आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
________________________________________

●● समोरचे लोक खोटारडे आहे. लाडकी बहिण योजनेला स्टे आल्याचे सांगतात.समोर ये आणि दाखवं बरं मला कुठे स्टे आलाय ते ? स्टे आणणाऱ्याकडे व तुझ्याकडे ही बघतो.: अजित पवार ●●
●● इतरांच्या भाषणांमुळे भाषणाला अर्धाच तास मिळाल्याबद्दल अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली.इथून पुढच्या काळात आपल्या सभेच्या वेळी मी येण्याआधी सर्वांनी भाषणे करुन घ्यावीत.आपण आल्यानंतर होणा-या एका भाषणानंतर आपण भाषण करुन पुढे जावून, असे पवार म्हणाले.●●

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *