आ.दत्तात्रय भरणे यांनी घेतली शहा बंधुची सदिच्छा भेट

लोकमत न्यूज नेटवर्क
इंदापूर : दीपावलीच्या पहिल्याच दिवशी आ.दत्तात्रय भरणे यांनी श्री नारायणदास रामदास चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख मुकुंद शहा,कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
या भेटीदरम्यान आ.भरणे व शहा बंधुंची दीर्घ चर्चा झाली; मात्र चर्चेचा तपशील समजू शकला नाही.शुभेच्छा देण्यासाठीच ही भेट झाल्याचे सांगण्यात आले.
इंदापूर विधानसभा निवडणुकीतील उमेदवार देण्याच्या कारणावरुन घडलेल्या घडामोडीनंतर आप्पासाहेब जगदाळे, प्रवीण माने यांच्या समवेत तिसरा पर्याय देण्यासाठी उभारण्यात आलेल्या तिस-या आघाडीच्या स्थापनेनंतर भरत शहा यांचे नाव
अधिक प्रकाशझोतात आले.
दोन दिवसात इंदापूर विधानसभा निवडणुकीसाठी कोणत्या उमेदवाराला पाठींबा द्यायचा निर्णय घेण्याचे संकेत देणा-या आप्पासाहेब जगदाळे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी बुधवारी (दि.३०) तातडीने भेटीसाठी बोलावून घेतले होते. त्यानंतर जगदाळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ही भेट घेतल्याची माहिती मिळत असल्याच्या पार्श्वभूमीवर आ.भरणे व शहा बंधूंच्या या भेटीने इंदापूरचे राजकारण ढवळून निघेल,असे चिन्ह दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *