इंदापूर : ज्यांचे विचार कधी ही जुळले नाहीत,जे राजकारणात कायम एकमेकांच्या विरोधात लढले. ते फक्त सत्तेसाठी व भरत शहा या एका व्यक्तीला पाडण्यासाठी एकत्र आलेले आहेत. त्यांच्या नकारात्मक व व्यक्तिद्वेषावर आधारित राजकारणाला पाठिंबा देऊ नका.विकासाकडे पाहून,पुढील पिढीच्या भविष्याच्या दृष्टीने पहा, इंदापूरच्या मातीशी जोडल्या गेलेल्या शहा घराण्याला साथ द्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज ( दि.३०) केले.
इंदापूर नगरपरिषदेच्या निवडणूकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पॅनलच्या प्रचारासाठी बाबा चौकात आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
आपल्या ४४ मिनिटांच्या भाषणात अजित पवार यांनी विरोधी गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार व त्यांच्या पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा नामोल्लेख केला नाही. मात्र त्यांच्यासह हर्षवर्धन पाटील व त्यांच्या पॅनलवर उपरोधिक टीका केली. कृष्णा भीमा विकास आघाडी पॅनलचे नाव घेत ते म्हणाले की, कशाला आम्हाला घेतले असे कृष्णा व भीमा नदी म्हणत असेल. विकास तर म्हणत असेल विकास शब्दाचा व यांचा संबंधच नाही. या पॅनलला कृष्णा भीमा भकास आघाडी म्हणायला पाहिजे.ही आघाडी जनतेच्या विकासासाठी अथवा इंदापूरच्या प्रगतीसाठी नाही. ती फक्त सत्तेसाठी झालेली आघाडी आहे. उद्या दत्तात्रय भरणे यांच्या जोडीला शहरातून भरत शहासारखा एखादा मिळाला तर पुढे कधीतरी काहीतरी आपल्याला मिळेल ते ही कायम बंद होईल, रिटायर होईपर्यंत काही आपल्याला मिळणार नाही याची धाकधूक त्यांना आहे.ही संधी साधू आघाडी आहे, असे पवार म्हणाले.
आत्ता निवडणूका लागलेल्या २८८ नगरपरिषदेत सर्वात जास्त आरोप प्रत्यारोप इंदापूरमध्ये सुरु आहेत. नको ती माणसे एकत्र आली आहेत. एकमेकाची तोंड बघत नव्हती, एकमेकांवर हल्ला करायची, आज मांडीला मांडी लावून बसत आहेत. कोण कुणाबद्दल काय बोलला आहे जरा इतिहास आठवा असे सांगत असा काही चमत्कार घडला असा सवाल पवार यांनी उपस्थित केला. भरत शहा नकोत, ते नसतील तर आम्हाला चालते असे का अशी विचारणा करत, भरत शहा मी तुमचं अभिनंदन करतो,आमच्या कुणाच्या ‘बा’ ला जमले नाही ते तुम्ही करुन दाखवले आहे, असे पवार म्हणाले.
भरत शहा यांच्या घरी बसलो असता, त्यांनी भीमा नदीवरील शिरसोडी कुगाव पुलाचा विषय मांडला. या पुलामुळे इंदापूर बाजारपेठेला मोठा फायदा होईल व्यापार पेठ सुधारेल.त्यातून इंदापूरचा विकास होणार आहे. पुणे आणि सोलापूर दोन जिल्हे जोडले जाणार आहे, त्यामुळे त्याला आपण मंजुरी दिली, अशी माहिती पवार यांनी दिली. हे बाकीच्यांनी का केले नाही. तुमच्यातले काहीजण एकोणीस वर्षे मंत्री होते त्यांना का करता आले नाही.मंत्री असताना काय केले, जॅकेट घातली?स्टाईल मारली? कुठेही फोटो काढायचा म्हटले तरी ते लगेच मध्ये हा चेहरा येतोच, गळ्याच्यान सांगतो खोटं सांगत नाही, या शब्दात त्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले.
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, इंदापूर शहराचा सर्वागीण विकास करण्यासाठी भरत शहा यांच्या नेतृत्वाखालील २१ जणांचा पॅनल आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून उभा केला आहे. विरोधकांना टीका करु द्या. त्यांच्या टीकेला आपण विकासाने उत्तर द्यायचे आहे. शिरसोडी पुलासह शहरविकासासाठी ८६७ कोटी रुपये दिलेले आहेत.
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत शहा म्हणाले की, पैसेवाला बघून उमेदवारी दिली असे काही लोक म्हणतात. आमच्या तीन पिढ्या ज्यांच्याबरोबर राहिल्या. ज्यांनी मला कारखाना, बँक, नगरपरिषदेसाठी संधी दिली, त्यांनी आमचा पैसा बघून ती संधी दिली होती का. जर माझ्यात कर्तृत्व नव्हते तर माझ्याकडे चार चार संस्था दिल्या होत्या त्या संस्था अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मी जीवाचे रान केले. त्यावेळेस हा माणूस पैसेवाला आहे त्याला न्याय द्यायला नको असे तुम्हाला वाटले नाही का, असे सवाल त्यांनी उपस्थित केले. आत्ता अजित पवार,दत्तात्रय भरणे यांनी आपणास संधी दिली तर पोटात दुखायचे कारण काय असे भरत शहा म्हणाले.
या वेळी आप्पासाहेब जगदाळे, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जयदीप कवाडे,बाळासाहेब सरवदे, शिवाजी मखरे व इतरांची भाषणे झाली.
●●हर्षवर्धन पाटील यांच्या संदर्भात बोलताना पवार म्हणाले की, १९ वर्षात त्यांनी काय काय केले. आपली इंदापूर अर्बन बँक पहा नावारूपाला आणली. आपला निरा भिमा कारखाना केवढा जोरात चाललाय.स्व. शंकर पाटील यांनी अतिशय बारकाईने उभा केलेला कर्मयोगी साखर कारखाना तुमच्या नेतृत्वाने चालवायला दिला. एवढे आमचे कर्तृत्व बघा, त्या निरा भीमा सहकारी साखर कारखान्यावर कर्जाचा डोंगर केला आहे. आम्ही पीडीसीमधून पैसे दिलेत. १९ वर्षे नेतृत्व करुन तुम्ही एकतरी चांगलं काम केले आहे ते दाखवा असे आव्हान अजित पवार यांनी दिले.●●
●● दत्तात्रय भरणे साडेतीन वर्षे मंत्री आहेत. ‘ते’ एकोणीस वर्षे मंत्री होते. मग तुमची नगरपरिषद, न्यायालय, प्रशासकीय भवन यांच्या इमारत झाल्या का असा सवाल अजित पवार यांनी केला. लाथ मारेन तिथून पाणी काढण्याची धमक नेतृत्वात असावी लागते. नुसता नट्टापट्टा करून चालत नाही, असे ते म्हणाले. कोणीतरी शिरसोडीच्या पुलाची देखील चेष्टा केल्याचे समजले. या पुलाने काय होणार आहे असा सवाल देखील केला असे सांगून, जर तुम्हाला व्हिजन असेल तर काय होणार हे कळेल ना. तुम्ही जर हाच विचार केला की या पुलावर जाऊन कोणीतरी आत्महत्या करेल तर मी काय करणार आहे? माझ्या ते मनातच येत नाही पण यांच्या मनात येतं त्याला मी काय करु असे म्हणत पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांना सडकले.●●
●● तिघे तिघे हातात हात घालून चाललेत काय भाषण करत आहेत, तुमच्या अंतर्मनाला विचारा आपण खरंच मनापासून भाषण करत आहोत का? ते सांगत असतील देवा आज मी जरा वेगळं बोलणार आहे पण तू मनावर घेऊ नकोस, आम्हाला भरत शहा डोळ्यासमोर दिसत आहेत म्हणून हे सगळं करावं लागत आहे, एकट्या या माणसाची मान खाली घालण्यासाठी हे नेतेमंडळी एकत्र आलेत. काहीजण आर्थिक सक्षम आहेत काही जणांचा वक्तृत्व चांगल आहे, नुसतं वक्तृत्व चांगला असून पैसा असून लोकांचे प्रश्न सुटत नाहीत, असे अजित पवार म्हणाले.●●
●● मी आता हळूच भरत शहा यांना विचारत होतो, इंदापूर बँक कशी आहे,ते म्हणाले बरी आहे बरी आहे, म्हणजे ती सलाईन वरच आहे ती काही सलाईनवरून बाहेर निघेना, असे पवार म्हणताच सभास्थानी हशा पिकला.●●
