

शैलेश काटे
इंदापूर : पंढरीच्या विठ्ठलाला भेटण्याचा, त्याचे दर्शन घेण्याचा ध्यास घेतलेल्या वारकऱ्यांचा पायी जाण्याचा मार्ग प्रशस्त व्हावा, त्यांना सुविधा मिळाव्यात यासाठी सणसर पासून सराटी पर्यंतच्या चौपदरी पालखीमार्ग तयार करण्याचा घाट घातला गेला. २०२१ च्या नोव्हेंबर महिन्यात सुरु झालेल्या या प्रकल्पाचे काम २०२५ चे पाच महिने उलटून गेले तरी ही पूर्ण झालेले नाही.
पालखीमार्गाचे काम एका कंपनीला देण्यात आले. त्या कंपनीने तीन पोटठेकेदार कंपन्यांना कामे विभागून दिली. ही कामे करताना या कंपन्यांनी इंग्रजांच्या चालीप्रमाणे पालखीमार्गाच्या कामाच्या नावाखाली तालुक्यातील कच्चा माल त्यांच्या इतर ठिकाणी चालणाऱ्या कामांसाठी अक्षरशः खणून काढत शेकडो शेतकऱ्यांच्या पिकांची व शेताची न भरुन येणारी हानी करत, त्यांच्या भावी पिढ्यांचे भविष्य उद्ध्वस्त केले आहे.
तालुक्यातील बड्या राजकीय नेत्याच्या शब्दाचा मान राखला गेला पाहिजे,त्यांचे कार्यकर्ते असणारांचे व्यवसाय टिकले पाहिजेत या धोरणाने पालखीमार्गाचे काम केल्याचे दिसते आहे.डांबरीकरणाचे काम असेल तर ते किमान तीस वर्षांपर्यंत टिकले पाहिजे. काँक्रिटीकरण असेल तर पन्नास ते साठ वर्षांपर्यंत टिकले पाहिजे असा या कामांचा दंडक आहे.मात्र दहा ते बारा वर्षाच्या आतच डागडुजी करण्याची कामे सुरु झाली पाहिजे अशा हिशेबाने पालखी मार्गाचे काम तशा दर्जाचे काम झालेले आहे.पालखीमार्गाच्या उभारणीसाठी वापरण्यात आलेल्या वस्तू टेंडर बरहुकूम नाहीत असा लोकांचा दावा आहे. या वस्तुंचा दर्जा निश्चित करण्यासाठी त्या गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळा, केंद्रीय रस्ते संशोधन संस्थांकडून प्रमाणित करुन घेणे आवश्यक होते. तसे झालेले नाही.राजकारणी बोले तशाच पध्दतीने काम चाले असे काम झालेले आहे.वरवरुन लखलखीत चकचकीत दिसणा-या या कामांची सखोल तपासणी होणे गरजेचे आहे.
एखाद्या कामाचे टेंडर निघताना त्या कामाचा आराखडा व रक्कम एकच असते.मात्र पालखीमार्गाचे काम सुरु असताना राजकीय नेत्यांना हाताशी धरुन त्यांना व त्यांच्या विश्वासातील स्थानिक व्यवसायिकांच्या फायद्याचे गणित आखण्यात आले. वेळप्रसंगी रस्त्याचे डायग्राम बदलले गेले आहेत. या संदर्भात पालखी मार्गाची उभारणी करण्यात आली. या कामावर नियंत्रण ठेवणारे पंढरपूर येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यालय, त्याबाबतचे करारनामे दाखवण्यास टाळाटाळ करते. या कार्यालयाच्या इंदापूर मधील बाब्रसमळ्यात असणा-या शाखेतील अधिकारी कधीच तेथे उपस्थित नसतात.
आजच्या घडीला बारामतीमधील उंडवडी सुपे ते निमगाव केतकी रस्त्यापर्यंतचे काम अपूरे आहे.इंदापूर ते सराटी या रस्त्याचे काम सुरु आहे.ते काही ठिकाणी पूर्ण तर काही ठिकाणी अपूर्ण आहे. या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी रस्त्याच्या ज्या बाजूला नेते मंडळींच्या बगलबच्च्यांचे हॉटेल,पेट्रोलपंप आहेत. त्या बाजुकडे नियमबाह्य पध्दतीने वाहतूक वळवली जात आहे. यासाठी त्यांना कोणी नाहरकत दाखले दिले या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. या पार्श्वभूमीवर जर अपघातासारखी गंभीर घटना घडली तर त्याची जबाबदारी कोणाची हा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
इंदापूर तालुक्यातील इंदापूर ते अकलूजपर्यंत जाणा-या पालखीमार्गाचे काम एन.पी.इन्फ्राप्रोजेक्टस या कंपनीला मिळाले.या कंपनीची कामे इतर ठिकाणी ही सुरु आहेत. इंदापूर तालुक्यात अवसरी व बेडशिंगे भागात मुबलक प्रमाणात खडी व मुरुमाचे साठे असलेल्या जमिनी आहेत हे कंपनीने हेरले. मग त्यासाठी संबंधित जमिन मालकाशी करार करुन त्यांनी त्या ठिकाणी खडीक्रशर सुरु केले. कंपनीतील अधिकारी वर्गाने महसूल व पोलीस यंत्रणेशी संगनमत करुन खडी व मुरुमाचे बेसुमार उत्खनन सुरु केले.नाममात्र महसूल भरुन उत्खनन केलेले हे खनिज त्यांच्या दुस-या कामांकडे ही पाठवण्याचा सपाटा लावला.खाणी पाडून शासनाचा कर बुडवण्याचा प्रकार अनेक ठिकाणी होत आहे.खडीक्रशर सुरु असताना, ब्लॉस्टिंग सुरु असताना जमिनीला बसणारे हादरे, रात्रंदिवस बेकायदा चाललेली वाहतूक, धुरळा यामुळे ब्रिटीशकालीन तलाव, तळी, विहीरी, बोअरवेल यांचे अपरिमित नुकसान होत आहे.पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत अडले गेले आहेत.अनेक ठिकाणी शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी वापरात येणारे कालवे बुजवण्यात आले आहेत.येणा-या पिकांवर धुळीचे थर बसल्याने पिकांचे सत्व हरवत चालले आहे. या शेतक-यांच्या भावी पिढ्यांसाठी कोणता ही नेता चकार शब्द बोलायला तयार नाही, ही वस्तुस्थिती आहे.
सणसर ते सराटी भागातील कामासाठी अनेक ठिकाणी महसूल विभागाची परवानगी न घेता खडी व मुरुमासाठी उत्खनन करण्यात आले आहे.स्थानिक ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला न घेता खोदकाम करुन काम सुरु करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. महसूल विभागाने पहाणी व तपासणी करणे आवश्यक आहे.
त्यासाठी संबंधित कंपनीने महसूल विभागाची परवानगी घेणे आवश्यक होते.मात्र ती घेतली गेली नाही. अथवा जेवढी परवानगी घेतली त्याहून कितीतरी पटीने जास्त उत्खनन करण्यात आलेले आहे. स्थानिक ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला न घेता खोदकाम करुन काम सुरू केले.
इंदापूर बारामती रस्त्यावर गोखळी व तरंगवाडी या भागात भुयारी मार्ग काढण्यात यावा ही मागणी अद्याप ही प्रलंबित आहे. या भागातून कर्मयोगी सहकारी कारखाना ते वडापूरी हा रहदारीचा रस्ता जातो.गुरुकुल विद्यामंदिरात सुमारे दोन हजार विद्यार्थी शिक्षण घेतात.व्यवसायानिमित्त बाहेरगावी ये जा करणा-या लोकांची संख्या मोठी आहे. गुरुकुल विद्यामंदिरात आसपासच्या गावातून पालकांसमवेत दुचाकी चारचाकी वाहनाने, एसटीने येणा-या विद्यार्थ्यांची संख्या ही लक्षणीय आहे.या पार्श्वभूमीवर रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग काढण्यात यावा अशी मागणी अनेक वेळा करण्यात आली.भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकांकडे पत्रव्यवहार केला आहे. रास्ता रोको आंदोलन झाले. मात्र कसली ही दखल घेण्यात आलेली नाही.
●● पालखीमार्गाची कामे अपूर्ण असतानाच संबंधितांचे चलन सुरु व्हावे यासाठी बेलवाडी व सराटी या दोन्ही टोलनाक्यांची कामे पूर्ण झाली. मात्र उंडवडी सुपे ते निमगाव केतकी रस्त्यापर्यंतचे काम अपूरे असल्याने बेलवाडीचा टोलनाका चालू केलेला नाही. तर सराटी येथील टोलनाक्याचे ई टेंडर निघाले नसल्याने टोलआकारणी सुरु झालेली नाही.आधी सुविधा द्या नंतर टोल आकारणी करा अशी मागणी लोकांकडून होत आहे.●●
●● इंदापूर बारामती रस्त्यालगत गोखळी गावाच्या जवळ वेताळबाबाचे प्राचीन मंदिर होते. घुमटाकार जागेत गडद भगवा शेंदूर थापलेली वेताळबाबाची पाषाणाकृती तिच्या समोरचा मिणमिणता दिवा. पाठीमागे असणारी महाकाय वटवृक्ष, पिंपळवृक्षांची घनदाट गर्दी,कभिन्न अंधारात वेताळबाबाचे उग्रमंगल रुप पाहिल्यानंतर मनातील सर्व पापे नष्ट होतील ही किमया लहानपणापासून ये जा करणा-या प्रत्येकाने अनुभवली होती. पालखीमार्गाच्या कामामुळे तो घुमटच काय वृक्षराजीसुध्दा काढून टाकण्यात आली. आत्ता उघड्यावर पत्र्याच्या शेडमध्ये असलेले वेताळबाबा पहाताना मन विषण्ण होते. देवळाच्या दोन्ही बाजूने रस्त्याच्या संरक्षक भिंती आल्याने त्या देवळाच्या आस्तित्वाविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.●●
●● या पालखी मार्गावर बारामतीपासून इंदापूर व तेथून अकलूज पर्यंतच्या राज्य रस्त्याच्या दुतर्फा वटवृक्ष, चिंच,निंब व पिंपळाचे महाकाय वृक्ष होते. उन्हातान्हातून पंढरीला चाललेल्या वारक-यांना शांत शीतल छाया देणारी ही वृक्षराजी पालखीमार्गाच्या या कामासाठी अक्षरक्षः मूळापासून उखडून काढण्यात आली.गेल्या दोन तीन वर्षापासून टळटळीत प्रखर उन सोसत वारकऱ्यांना पंढरी जवळ करावी लागत आहे. हा पालखीमार्ग ‘ग्रीन हायवे’ म्हणून ओळखला जावा यासाठी पुण्यापासून पंढरपूरपर्यंत ४२ हजार झाडे लावण्यात येणार असल्याचा गाजावाजा करण्यात आला होता.इंदापूर तालुक्यात अशी झाडे दिसत नसल्याने ती मध्येच करपलीत की काय अशी शंका इंदापूरकरांच्या मनात आहे.●●
●● केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा हवाला देवून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी तुकाराम महाराज पालखी मार्गावरील बारामती ते इंदापूर टप्प्याकरिता १ हजार ४७१ कोटी रुपये व इंदापूर ते तोंडले बोडले या टप्प्याकरीता १ हजार ६०१ कोटी रुपये अशी एकूण ३ हजार ७२ कोटी रुपयांची भरीव तरतूद केल्याबद्दल त्या वेळी गडकरी व केंद्र शासनाचे आभार मानले होते. पण आत्ता सुरु असणाऱ्या कामाकडे त्याचे लक्ष आहे किंवा कसे हे समजण्यास मार्ग नाही.●●
