इंदापूर : आपल्या लेकीचे औक्षण करुन लक्ष्मी पूजन साजरे करण्याचा अनोखा पायंडा जिजाऊ ब्रिगेडच्या महाराष्ट्र राज्याच्या संघटक प्रा.जयश्री भास्कर गटकुळ यांनी पाडला आहे.
घरातील महिला या सौभाग्य लक्ष्मी आहेत.त्यामुळे मानवतावादी व वैज्ञानिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मातीच्या मूर्तीचे पूजन करण्याऐवजी घरातील लेकी सुनांचे पूजन करण्याचे आवाहन प्रा.गटकूळ यांनी केले आहे.
त्या म्हणाल्या की,विज्ञानवादी दृष्टिकोन वाढीस लागावा यासाठी मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून लक्ष्मी पूजनाच्या दिवशी माता जिजाऊ,सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर,माता रमाई,महाराणी ताराराणी,फातिमा बीबी आदि महानायिकांचे पूजन करण्यात येते.
या पुढे जावून घरातील पत्नी,आई,बहीण व कन्या या देखील लक्ष्मीचेच रूप आहेत.त्यामुळे मातीच्या मूर्तीचे पूजन करण्याऐवजी मानवतावादी व वैज्ञानिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून घरातील सूना व लेकीचे पूजन करण्याचे आवाहन जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने दिवाळीआधी करण्यात केले होते.त्यास शहरी भागासह ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळाला. दीपावली लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आईने आपल्या लेकीचे,पतीने पत्नीचे,सासूने सूनेचे व सूनेने सासूचे औक्षण करत लक्ष्मीपूजन साजरे केले,अशी माहिती प्रा.गटकूळ यांनी दिली.पुढील वर्षी आणखी व्यापक स्वरुपात हा उपक्रम राबवण्याचा मनोदय ही त्यांनी व्यक्त केला.
लेकीचे औक्षण करुन केले लक्ष्मी पूजन साजरे
