
शैलेश काटे
इंदापूर : उन्हाच्या तीव्रतेमुळे वनपरिक्षेत्रातील पाण्याचे बहुतेक स्त्रोत आटल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्र सेवा दल व स्नेह प्रेमी परिवाराच्या वतीने गागरगाव परिसरातील वनक्षेत्रातील पाणवठ्यात टँकरद्वारे पाणी सोडण्यात आले.
राष्ट्र सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष रमेश शिंदे,ॲड.सिद्धार्थ मखरे, स्नेह प्रेमी परिवारातील कुमार शिंदे,गणेश कोकरे,वनरक्षक शुभम कडू,शुभम धायतडक,वन कर्मचारी सुभाष काळेल, चंद्रकांत सावंत,शौर्य मखरे यावेळी उपस्थित होते.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आहे.चिंकारा,तरस, ससे,लांडगे, कोल्हे अनेक अनेक वन्यप्राणी तेथे रहिवास करतात. उन्हाळ्याच्या दिवसात अन्न आणि पाण्यावाचून त्यांची मोठी परवड होते. त्याच्या शोधात लोकवस्तीकडे धाव घेताना अनेकदा या मुक्या जीवांचा अपघाती मृत्यू होतो किंवा गावालगतच्या भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात त्यांना दुर्देवाने जीव गमवावा लागतो. अशा घटना घडू नयेत यासाठी संपूर्ण उन्हाळ्यात वनपरिक्षेत्रातील पाणवठ्यांमध्ये टँकरने पाणी सोडण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.या बरोबर पावसाळ्याच्या सुरुवातीला वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याचा ही आमचा मनोदय आहे असे पत्रकाराशी बोलताना रमेश शिंदे व ॲड.सिद्धार्थ मखरे यांनी सांगितले.
