
इंदापूर : श्री छत्रपती शिवाजी मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे एका बांधकामाच्या टाकीत दोन दिवसांपासून पडलेल्या आकर्षक दुर्मीळ असणाऱ्या वारकरी पक्षाचा जीव वाचला.
या संदर्भात पत्रकारांशी बोलताना सामाजिक कार्यकर्ते व निसर्गप्रेमी प्रशांत शिताप म्हणाले की, रविवारी रात्री श्री छत्रपती शिवाजी मित्रमंडळाचा कार्यकर्ता शुभम धारुरकर याने, दत्त मंदिराजवळच्या एका बांधकामातील टाकीत दोन दिवसापासून एक पक्षी पडल्याचे आपणास कळवले. श्री छत्रपती शिवाजी मित्र मंडळाचे कार्यकर्ते सोमनाथ खंडागळे, निखिल महाजन,अक्षय परदेशी,अमोल परदेशी,शुभम धारुरकर,श्याम महाजन,वरद महाजन बापू वाघमारे, वेदांत घोरपडे यांच्यासमवेत घटनास्थळी गेल्यानंतर, सात ते आठ फूट खोल टाकीत तो पक्षी पडल्याचे दिसले.त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु असताना तो घाबरून तो चोचीने व बळकट नख्यांनी हल्ला करत होता.वेदांतने ग्लोव्हज घालून त्याला पकडले. वर आणल्यानंतर जवळच्या बास्केटमध्ये त्याला ठेवले.त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आले, असे शिताप यांनी सांगितले.
● वारकरी पक्षी ज्याला मराठीत ‘चांदी”किंवा ‘किंवी’ असे ही म्हणतात. या जलचर पक्षाचे शास्त्रीय नाव फुलिका आट्रा आहे. तो रॅलिडे कुटुंबातील आहे. इंग्रजीत त्याला युरेशियन कूट किंवा कॉमन कूट म्हणतात.हा पक्षी भारतासह युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया,न्यूझीलंड व उत्तर आफ्रिकेच्या काही भागात आढळतो. भारतात तो स्थानिक व स्थलांतरित अशा दोन्ही स्वरुपात आढळतो.भारतातील पाणवठ्यांजवळ आढळणाऱ्या सामान्य अशा या जलचर पक्ष्याची चांदीसारखी ओळख, थव्याने राहण्याची सवय, पाण्यातील चपळ हालचाली यामुळे पक्षीप्रेमींचा लाडका पक्षी पुढील पिढ्यांना ही दिसत रहावा या करिता त्यांच्या अधिवासाचे संरक्षण करणे हे पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. : प्रशांत शिताप●
