इंदापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आजच्या आपल्या नियोजित दौऱ्यात मुकुंद शहा, भरत शहा यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.
महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील,त्यांचे पूत्र राजवर्धन पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राज्याचे सरचिटणीस,पक्ष प्रवक्ते ॲड.राहुल मखरे,तालुकाध्यक्ष ॲड. तेजसिंह पाटील,कार्याध्यक्ष महारुद्र पाटील व इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.औपचारिक गप्पा झाल्यानंतर शरद पवार व शहा बंधु यांची बंद खोलीत चर्चा झाली.चर्चेदरम्यान हर्षवर्धन पाटील शहा यांच्या निवासस्थानाबाहेर थांबले होते.
पवार व शहा बंधू यांच्यामध्ये सुमारे पंधरा मिनिटे चर्चा झाली.चर्चेनंतर नियोजित कार्यक्रमासाठी हर्षवर्धन पाटील यांच्यासमवेत शरद पवार लगेचच तेथून निघून गेले.पत्रकारांशी त्यांचा संवाद झाला नाही.शहा बंधू ही भेटीसंदर्भात पत्रकारांशी काही बोलले नाहीत.
● हर्षवर्धन पाटील व शहा बंधू यांचे ताणलेले संबंध, विधानसभा निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या तिसऱ्या आघाडीतील भरत शहा यांचा उठावदार सहभाग या पार्श्वभूमीवर शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने त्यांची भेट घेणे, चर्चा करणे ही फार मोठी बाब आहे,त्यामुळे या भेटीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेले आहे.भेटी दरम्यान काय झाले हे जाणून घेण्याची लोकांची उत्सुकता ही ताणली गेली आहे.●
शरद पवारांनी घेतली शहा बंधुंची भेट
