इंदापूर : राज्यात निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार आहे. आमचे सरकार सत्तेवर आलेनंतर महालक्ष्मी योजना सुरु करून महिलांच्या बँक खात्यात प्रति महिना तीन हजार रुपये जमा करणार आहे.महिलांना मोफत एसटी प्रवास,वयाची अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलींना एक लाख देणार.महिलांना वर्षाला पाचशे रुपयात सहा सिलेंडर देण्याचे जाहीरनाम्यात जाहीर केले आहे. महाविकास आघाडीचे सरकार हे महिला भगिनींचे सरकार असणार आहे,असे प्रतिपादन इंदापूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे.
मंगळवारी (दि.12) झालेल्या प्रचार दौ-यात सुरवड येथे ते बोलत होते.पिंपरी बु.,लाखेवाडी,निरवांगी,वरकुटे खु. या गावांचा त्यांनी झंझावती प्रचार दौरा केला.
ते म्हणाले की,शेतकऱ्यांचे तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाईल.नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे.दुधाच्या उत्पादन खर्चानुसार प्रत्येक वर्षी दुधाला दर दिला जाईल. प्रत्येक कुटुंबाला २५ लाख रुपयांचा आरोग्य विमा दिला जाणार आहे. सुशिक्षित बेरोजगार युवकांना दरमहा चार हजार रुपयांची मदत केली जाईल अशा तरतुदी जाहीरनाम्यात करण्यात आल्या आहेत.
गेल्या २५ वर्षात शरद पवार यांनी इंदापूरच्या विद्यमान आमदारांना भरभरुन पदे दिली. तरी देखील 84 वर्षांच्या आपल्या नेत्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी गद्दारी केली आहे. दुसऱ्या उमेदवारास शरद पवारांनी उद्योग धंदे उभारणीसाठी परवाने,सवलती,अनुदान आदी विविध प्रकारे मोठे सहकार्य केले आहे.त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत पवार यांना दोन्ही उमेदवारांनी विरोध केल्याने मतदारांनी त्यांना जागा दाखवून द्यावी,असे आवाहन हर्षवर्धन पाटील यांनी केले.
गेल्या दोन दिवसात अनेक जाती-धर्माच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. सन १९५२ पासून ज्येष्ठ नेते दिवंगत शंकरराव पाटील यांच्या शिकवणीनुसार सर्व जाती-धर्मांना बरोबर घेऊन आंम्ही काम करत आहोत. वीस वर्षांच्या आमच्या सत्तेच्या काळात आम्ही केलेला इंदापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास जनतेला माहित आहे,असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
यावेळी पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲड.तेजसिंह पाटील, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नितीन शिंदे,उदयसिंह पाटील, शिवाजी हांगे,बळीराम शिंदे,संजय कांबळे,शंकर शिंदे,संजय शिंदे,निलेश जगताप,अरुण पवार,प्रीतम देवकर,दादा तोबरे, ओंकार नलावडे,रुपनवर आदिंनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक सुरेश मेहर यांनी केले. पक्षाचे कार्याध्यक्ष महारुद्र पाटील,विलासबापू वाघमोडे,अमोल भिसे,काँग्रेस पक्षाचे काका देवकर आदींसह पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन सूर्यकांत फडतरे यांनी केले.
●●राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांना विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमताने निवडून आणण्याच्या इर्षेने सुरवड,वकीलवस्ती,शेटफळ हवेली,भोडणी, पंधरवाडी,वडापुरी गावातील युवक वर्ग कामाला लागल्याचे चित्र या वेळी दिसून आले.हर्षवर्धन पाटील यांच्याबद्दल युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे,हे या निवडणुकीतील वैशिष्ट्य आहे.●●
