इंदापूर : आपण दिलेल्या पाठबळावर मी विधानसभा निवडणुकीसाठी उभा राहिलो आहे. लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिली तर पाच वर्षे तुमचा सेवक या नात्याने काम करेन, अशी ग्वाही विधानसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांनी प्रचाराच्या सांगता सभेत बोलताना आज ( दि.१८) दिली.प्रियदर्शिनी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या पटांगणात मोठ्या गर्दीत ही सभा झाली.
या वेळी बोलताना प्रवीण माने म्हणाले की,ही निवडणूक सर्वसामान्य जनतेने हातात घेतली आहे.येणारी वीस तारीख तुमच्या आमच्या भवितव्यासाठी खुप महत्वाची आहे.तालुक्यात परिवर्तनाचे वारे दिसते आहे.२०१७ मध्ये नवखा असून देखील मला जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून दिले.जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणलेल्या ३०० कोटी रूपयांच्या निधीमधून दर्जेदार कामे केली.
तालुक्यात उत्कृष्ट भौगोलिक स्थिती आहे.दोन नद्या,पाणलोट क्षेत्र,कालवे आहेत.वीजेचा प्रश्न आहे.शेतीला पाणी मिळावे यासाठी आपण सुरळीत वीज देवू.गावागावात तरुणांची संख्या मोठी आहे. त्यांची बेरोजगारी हटवण्यासाठी येत्या पाच वर्षात काम करावे लागणार आहे.
इंदापूर तालुक्यात पर्यटनस्थळांना चालना देण्याचे काम आपण निश्चितपणे करु.युवकांना रोजगार देण्यासाठी प्रकल्प उभारण्याचा आपला विचार आहे.पोलीस भरती व त्या आशयाच्या नोकऱ्यांसाठी प्रसंगी स्वखर्चाने ॲकॅडमी उभारण्याची ही तयारी आहे.सोनाई उद्योगच्या माध्यमातून दुधाबरोबरच ऊसाचा ही प्रश्न आपण निश्चितपणे सोडवणार आहोत,अशी ग्वाही माने यांनी दिली.
ते म्हणाले की,विरोधकांनी माझी उमेदवारी गांभीर्याने घेतली नव्हती.उमेदवारी अर्ज भरण्यापासून,अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत मी निवडणूक लढवणारच नाही असा सूर त्यांनी लावला होता.मात्र नंतर टीका करणे सुरु आहे.मला दुस-या पक्षाचा उमेदवार म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे.टीका मला ही करता येते.परंतू जनता चांगल्या कामासाठी संधी देते. कोणावर टीका करण्यासाठी नाही,असे माने म्हणाले.
● माझ्या उमेदवारीमुळे अस्वस्थ झालेल्या हर्षवर्धन पाटील यांनी,सोनाई उद्योगसाठी दोन साखर कारखान्यांमधील अंतराचा कायदा शरद पवार यांनी बदलल्यानंतर ही आम्ही शरद पवार यांना धोका दिल्याची टीका चालवली आहे. माझे वडील व मी शरद पवार यांचे कार्यकर्ते होतो. त्या कायद्याचा त्रास होण्यास कारणीभूत तुम्हीच होता.त्यामुळे पवारांना कायदा बदलावा लागला,असा खरमरीत पलटवार प्रवीण माने यांनी केला.●
या सभेदरम्यान प्रवीण माने यांनी उपस्थित जनसमुदायासमोर त्यांनी तयार केलेल्या प्रतिज्ञापत्राचे वाचन केले.या प्रतिज्ञापत्रात माने यांनी मतदारांना नऊ वचने दिली आहेत.त्यामध्ये आपण संपूर्ण कार्यकाळात सेवक म्हणून गोरगरीब, महिला,तरुण, वृध्द लोकांसाठी सहज उपलब्ध राहू.निवडून आल्यानंतर आपण किंवा आपल्या कुटुंबातील कोणी ही सदस्य कसले ही कंत्राट घेत नाहीत.येथून पुढे ही घेणार नाहीत.आमदारांना शासनाकडून मिळणारा दर महिन्याचा पगार तालुक्यातील गोरगरीब मुलींच्या शिक्षणासाठी व औषधोपचारासाठी वर्ग करणार.इंदापूर मधील एम.आय.डी.सी.मध्ये नवीन उदयोगधंदे निर्माण करून, उद्योगधंद्यांना चालना देवून इंदापूर तालुक्यातील हजारो तरूणांसाठी रोजगार निर्मिती करणार.तालुक्यातील युवकांना स्पर्धा परिक्षा देण्यासाठी सुसज्ज सर्व सुविधा असलेली ॲकॅडमी उभा करणार. पूर्वीपासून चालू असलेले सामुदायिक विवाह सोहळा,डोळ्यांच्या शस्त्रक्रिया, महिला व तरुणांसाठी विविध सामाजिक उपक्रम हे कायम चालू राहतील.निवडून दिल्यास त्यामध्ये आणखी भर घातली जाईल.तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ऊसाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार. कालवे व धरणातील शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी टोकाचा संघर्ष करण्याची तयारी ठेवेन.माझ्याकडून भ्रष्टाचार झाला तर कायमस्वरुपी राजकीय संन्यास घेईल,या वचनांचा त्यामध्ये समावेश आहे.
