इंदापूर : दुपारनंतर मतदानाचा वेग वाढलेल्या इंदापूर विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ७६.१० टक्के मतदान झाले आहे. ३ लाख ४१ हजार ४८५ मतदारांपैकी २ लाख ५९ हजार ८७१ मतदारांनी मतदान केले आहे. २०१९ च्या निवडणुकीच्या तुलनेत ०.२४ टक्क्यांनी ‘टक्का’ घसरला असला तरी निवडून येणारा उमेदवार दोन ते तीन हजारांच्या मताधिक्यानेच निवडून येईल असा प्राथमिक अंदाज आहे.
बुधवारी सकाळी सात वाजता इंदापूर तालुक्यातील ३३७ मतदान केंद्रांवर मतदान सुरु झाले. सकाळी सात ते नऊ या वेळात ५.०५ टक्के मतदान झाले. अकरा वाजेपर्यंत ते १६.०२ टक्के झाले. एक वाजेपर्यंत २९.५० टक्के मतदान झाल्याची नोंद झाली.तीन वाजेपर्यंत हा आकडा ४९.५० टक्क्यांपर्यंत पोहोचला होता.त्यानंतर मतदानाचा वेग वाढत गेला. सकाळी सात ते सायंकाळी पाच या कालावधीत ६४.५० टक्के मतदान झाले. नऊ वाजता तालुक्यातील मतदान पूर्ण झाले. त्यावेळी ते ७६.१० टक्क्यांवर जावून पोहोचले होते.
महायुतीचे उमेदवार आ.दत्तात्रय भरणे यांनी सकाळीच भरणेवाडी येथे मतदान केले. महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील व त्यांच्या कुटुंबियांनी बावडा येथे मतदान केले. अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांनी दुपारनंतर रुई येथे जावून सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.
शहरात सकाळपासून संथगतीने मतदान सुरु होते. ग्रामीण भागात त्या तुलनेत मतदानाला वेग होता. दुपारनंतर मात्र शहर व ग्रामीण भागात मतदानाचा वेग वाढला. रात्री नऊ वाजता तालुक्यातील मतदान पूर्ण झाले.
निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वच उमेदवारांनी प्रचारास सुरुवात केली होती.उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर प्रचाराला वेग आला. आ. भरणे यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, आ.अमोल मिटकरी आले होते. हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार व खा. सुप्रिया सुळे, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा.अमोल कोल्हे यांनी सभा घेतल्या. अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांनी प्रचाराच्या सुरुवातीपासून मोठ्या सभा टाळत, घोंगडी बैठका, कोपरा सभा घेण्यावर लक्ष केंद्रित केले. आवश्यक तेथे मोठ्या जाहीर सभा घेतल्या.
प्रचारसभांमध्ये आ.दत्तात्रय भरणे व हर्षवर्धन पाटील यांनी एकमेकांच्या कार्यशैलीतील दोष दाखवत टीकात्मक भाषणे केली. विशेष करुन आ. दत्तात्रय भरणे यांचा संयम ठराविक काळानंतर सुटतो हे माहिती असणा-या हर्षवर्धन पाटील यांनी त्यांना डिवचून पुढे जायचे धोरण राबवले. त्यासाठी कामांचा निकृष्ट दर्जा व मलिदा गॅंग या आयुधांचा त्यांनी पुरेपूर वापर केला. त्यामुळे आ. भरणे यांना स्पष्टीकरण देण्यातच बराचसा वेळ द्यावा लागला. या दोघांपेक्षा प्रचाराचे वेगळे धोरण प्रवीण माने यांनी आरंभले. या दोघांपैकी कोणावर ही कसलीच टीका न करता, तालुक्यातील विकासाच्या अनुशेषाची माहिती देत, संधी मिळाल्यास येत्या पाच वर्षात आपण काय करणार हे माने मांडत गेले. त्यास मतदारांचा प्रतिसाद मिळत गेला.
●● प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी लाखेवाडी येथे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बबन खाडे यांनी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ चाललेली भांडणे सोडवल्यानंतर त्यांना प्रभाकर खाडे व इतरांनी मारहाण केल्याची घटना घडली.या प्रकरणी चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.शिरसटवाडी येथे आ.दत्तात्रय भरणे व निरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. शिरसटवाडी येथील मतदान केंद्रात जावून आ.दत्तात्रय भरणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ केल्याची घटना घडली.●●
●● शिरसटवाडी येथील मतदान केंद्रात जावून मतदार कार्यकर्ते व मतदान अधिका-यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी आ. दत्तात्रय भरणे यांचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. या प्रकरणी आपण निवडणूक निर्णय अधिका-यांकडे तक्रार करत कायदेशीर कारवाईची ही मागणी केली आहे, अशी माहिती ही पाटील यांनी दिली आहे.
ते म्हणाले की, आज दुपारी आ.भरणे यांनी हा प्रकार केला. आ. भरणे यांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी ही एका जणाला शिवीगाळ व दमदाटी केली होती. शिवीगाळ करणे, दमदाटी करणे हा आपला जन्मसिद्ध हक्क असल्यासारखे ते वागत आहेत. हे लोकशाहीस घातक आहे.●●
●● शरदचंद्र पवार यांच्यासारख्या लोकाभिमुख नेतृत्वामुळे राज्यात महाविकास आघाडी सत्ता येणारच आहे. त्याचबरोबर इंदापूर तालुक्यातील जनतेचा आपल्यावरचा विश्वास, साथ व आशीर्वाद यामुळे मी ही मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.●●
●● इंदापूर तालुक्यातील जनतेमध्ये मतदानासाठी उत्साह आहे. त्यांचा विश्वास पाहून ती मला निश्चितपणे विजयी करुन इंदापूरमध्ये परिवर्तन घडवेल, असा विश्वास इंदापूर विधानसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांनी व्यक्त केला.●●
