इंदापूर : राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यानी राजकीय पक्षांच्या निवडणूक प्रचार कामात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभाग घेतल्यास त्यांच्याविरुध्द विद्यापीठे व संबंधित संस्थांनी शिस्तभंगाची कठोर कारवाई करावी असा आदेश महाराष्ट्र शासन उच्च शिक्षण संचालनालयाने आज ( दि.५ ) परिपत्रकाद्वारे दिला आहे.
उच्च शिक्षण विभागाचे प्रभारी शिक्षण संचालक डॉ. शैलेन्द्र देवळाणकर यांच्या स्वाक्षरीने हे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.निवडणूक आचारसंहिता/२०२४/विशि-१/४९२५ या क्रमांकाने काढण्यात आलेल्या या परिपत्रकात असे म्हटले आहे की,सध्या राज्यामध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. या आचारसंहितेमध्ये निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता नियमाचे पालन करण्याबाबत विविध प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहेत.
दि.२० मे २०१० च्या शासन निर्णयान्वये राज्यातील अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेतर अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी सामाईक परिनियम अस्तित्वात येईपर्यंत महाराष्ट्र नागरी सेवा नियमातील तरतूदी लागू करण्यात आलेल्या आहेत. त्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम ५ (१) मध्ये नमूद केल्यानुसार, कोणत्या ही शासकीय कर्मचाऱ्याला कोणत्या ही राजकीय पक्षाचा किंवा राजकारणात भाग घेणाऱ्या कोणत्या ही संघटनेचा सदस्य होता येणार नाही,किंवा त्याच्याशी संबंध ठेवता येणार नाही किंवा कोणत्या ही राजकीय चळवळीत किंवा कार्यात कोणत्या ही प्रकारे भाग घेता येणार नाही किंवा सहाय्य करता येणार नाही.५(४) नुसार तो कर्मचारी कोणत्या ही विधानसभेच्या किंवा स्थानिक प्राधिकरणाच्या निवडणूकीत प्रचार करू शकणार नाही किंवा अन्यथा हस्तक्षेप करू शकणार नाही किंवा त्यासंबंधी आपले वजन खर्च करु शकणार नाही किंवा त्यात भाग घेऊ शकणार नाही, याकडे आपले लक्ष वेधण्यात येत आहे.
त्यामुळे राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी राजकीय पक्षांच्या निवडणूक प्रचार कामात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभाग घेतल्यास त्यांचेविरूद्ध विद्यापीठे व संबंधित संस्थांनी शिस्तभंगविषयक कठोर कारवाई करावी, असे परिपत्रकात शेवटी नमूद करण्यात आले आहे.
