तुतारी महाराष्ट्राच्या विधानसभेत वाजल्याशिवाय रहाणार नाही : हर्षवर्धन पाटील

इंदापूर : इंदापूर विधानसभेची निवडणूक किती रंगी आहे ती मला माहिती नाही; मात्र ती तुतारीची निवडणूक आहे व तुतारी महाराष्ट्राच्या विधानसभेत वाजल्याशिवाय रहाणार नाही,असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.
आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी वाघ पॅलेस येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की,इंदापूर विधानसभेची निवडणूक एका विचाराची निवडणूक आहे.शंकरराव पाटील यांच्यापासून राजेंद्रकुमार घोलप यांच्यापर्यंत सार्वजनिक क्षेत्रात असणा-या सर्व लोकांनी सर्वधर्मसमभावाचा विचार मांडला. सामान्याना सन्मान देण्याचे काम केले.मात्र विद्यमान लोकप्रतिनिधींनी मागील दहा वर्षामध्ये यांनी काय केले हा प्रश्न मला पडलेला आहे.कोण म्हणते सहा हजार कोटी रुपयांची कामे झाली.मात्र ही कामे पहाण्यासाठी दुर्बीण देण्याची तयारी एका कार्यकर्त्याने दाखवली होती,असे पाटील म्हणाले.
विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांच्यावर पाटील अक्षरशः तुटून पडले.ते म्हणाले की,तुम्ही काय केले.२००९ ला माझ्याविरुद्ध बंडखोरी केली.तुम्हाला सहा वर्षाकरिता पक्षातून काढून टाकले होते.दोन वर्षांत तुम्ही परत आलात.जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कोणी केले,दोन वेळा विधानसभेचे तिकीट कोणी दिले,राज्यमंत्री कोणी दिले याचा विचार कधी केलात का.अन् ज्या वेळेस शरद पवार यांच्यावर घाला घालण्याचा प्रयत्न झाला,त्यावेळेस किमान जनाची नाही मनाची तरी ठेवायला पाहिजे होती.शरद पवारांच्या मागे न उभा रहाता तुम्ही कोणाच्या मागे गेलात,याचे उत्तर तुम्हाला वीस तारखेला मिळणार आहे.निकाल २३ तारखेला लागल्याशिवाय रहाणार नाही.
शरद पवार यांना महाराष्ट्राची विस्कटलेली घडी पुन्हा बसवायची आहे.रयतेचे राज्य आणायचे असेल तर राज्यात परिवर्तन करणे गरजेचे आहे.त्यामुळे त्यांना साथ द्यावी असा आग्रह इंदापूर तालुक्यातील जनतेने धरला,या आग्रहामुळे आम्ही सर्वांनी पवारांच्या पक्षात प्रवेश केला.आम्ही स्वार्थासाठी पक्ष बदलला नाही,मात्र पक्ष बदलण्यावरुन आमच्यावर टीका केली जात आहे. प्रश्न उपस्थित केले जात आहेत,असे सांगून, निवडणूक रिंगणात आल्यानंतर हा हर्षवर्धन पाटील प्रत्येक प्रश्नाला चोख उत्तर दिल्याशिवाय रहाणार नाही,असा इशारा पाटील यांनी दिला.
विधानसभेच्या अठरा निवडणूका झाल्या पण कोणत्या निवडणुकीत कधी साड्या,तेलाचा डबा वाटला का ? यावेळेस कोणत्या ही महिलेने मागणी न करता साड्या वाटण्याची हौस का झाली.तुम्ही ज्या अर्थी साड्या वाटता त्यावरुन मतदार संघाची महिला मतदारांची हवा काय आहे हे तुमच्या लक्षात आले आहे,असा टोला पाटील यांनी मारला.
●● मागच्या आठवड्यात निवडणूक आयोगाने लाडकी बहिण योजना स्थगित करण्याचा आदेश काढला.साप्ताहिक कॅबिनेट बैठक घेण्याचा मंत्रिमंडळाचा शिरस्ता आहे.मात्र आठ आठ तासाला या बैठका झाल्या.लाडकी बहिण योजनेसह राज्य शासनाने काढलेले ११२ अध्यादेश निवडणूक आयोगाने रद्द केल्याचा दावा पाटील यांनी केला.●●

●● आमचे शरद पवार यांच्याबरोबर कधी ही वैयक्तिक मतभेद झाले नाहीत.ज्यांना महाराष्ट्र समजतो,अशी फार थोडी माणसं राज्यात आहेत.शरद पवार यांच्या तुलनेने तेवढ्या तोलामोलाचा नेता राज्यातील कोणत्या पक्षात आहे ते मला दाखवून द्या, असे आव्हान हर्षवर्धन पाटील यांनी केले.

●● पक्षाकडे उमेदवारी मागण्याचा हक्क प्रत्येकाला आहे. त्यातून काही जण नाराज झाले.काहींनी फॉर्म भरले.मेळावे झाले.ज्यांनी उमेदवारी मागितली ती चाळीस वर्षे काम केलेली आपलीच माणसं आहेत.तालुका कोणत्या दिशेने चाललेला आहे.शरद पवारांचे नेतृत्व अडचणीमध्ये आहे.राज्याला चांगले प्रशासन द्यायचे असेल तर तशा ताकदीची माणसं आपल्याला सरकारमध्ये आणावी लागतील म्हणून कदाचित शरद पवारांनी माझ्यासारख्याचा विचार केला असावा.मी मोठा,तुम्ही माझ्यापेक्षा लहान असे काही नाही.मात्र,प्रत्येकामध्ये काही ना काही गुणवत्ता असते,कदाचित त्याचा उपयोग करावा असे त्यांना वाटले असावे.आपण सर्वजण बरोबर आहोत,मात्र ही गोष्ट समजून घेण्याची आवश्यकता आहे.त्यामुळे पवारांचा विचार सोडून नका,असे आवाहन हर्षवर्धन पाटील यांनी केले●●

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *