- इंदापूर : इंदापूर तालुक्यातील शेती सिंचनासाठी उन्हाळी हंगामात खडकवासला कालव्याला दोन व नीरा डाव्या कालव्याला दोन आवर्तने देण्याचा निर्णय काल (दि.१) झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती राज्याचे क्रीडा अल्पसंख्यांक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पत्रकाराःना दिली.
ते म्हणाले की,पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत व जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात ही बैठक झाली.खडकवासला कालव्यातून उन्हाळी हंगामासाठी १८ फेब्रुवारीपासून सुरु करण्यात आलेले पाणी आवर्तन आवर्तन संपल्यानंतर येत्या २५ एप्रिल पासून दुसऱे आवर्तन देण्यात यावे,अशी आग्रही मागणी आपण बैठकीत केली. ती मागणी विचारात घेऊन दुसरे आवर्तन येत्या 25 एप्रिलपासून सुरु करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिले.
निरा डावा कालव्यातून इंदापूरच्या शेती सिंचनासाठी उन्हाळी हंगामात दोन आवर्तने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती भरणे यांनी दिली. ते पुढे म्हणाले की,या निर्णयानुसार निरा डाव्या कालव्याला ११ मार्च ते ३ मे या कालावधीत ५४ दिवसाचे उन्हाळी हंगामातील पहिले तर ४ मे ते २६ जून या कालावधीत ५४ दिवसाचे दुसरे उन्हाळी हंगामातील आवर्तन शेती सिंचनासाठी दिले जाणार आहे.
सणसर जोड कालव्याला खडकवासला प्रकल्पाच्या मंजूर पाणी वाटपातील तरतुदीनुसार पाणी सोडणे बंधनकारक आहे. या जोड कालव्याला आराखड्यात तरतूद केल्याप्रमाणे पाणी सोडण्यात यावे. ते २२ गावांना शेती सिंचनासाठी देण्यात यावे अशी आग्रही भूमिका आपण बैठकी मांडली, अशी माहिती त्यांनी दिली.
● शेतक-यांच्या हितासाठी खडकवासला व निरा डावा दोन्ही कालव्याला पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्यात यावे. जास्तीत जास्त काळ इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती सिंचनासाठी आवर्तन द्यावे. पिण्याच्या पाण्याची गैरसोय होवू नये याकरिता ज्या तरंगवाडी तलावाच्या पाण्यावर इंदापूर शहर व अनेक गावच्या पाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत, त्या तलावात पाणी सोडण्यात यावे, अशा मागण्या आपण केल्या. पाण्याची त्यावेळची परिस्थिती पाहून सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री पवार व जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी दिल्याचे भरणे यांनी स्पष्ट केले.●
