इंदापूर : रस्ता मागणीच्या निकालाची कागदपत्रे बनवून देण्यासाठी स्वतःसह ‘साहेबां’साठी मागितलेली २५ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या तहसील कार्यालयील महसूल सहाय्यक महिला कर्मचाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी ( दि.२८) सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास रंगेहाथ पकडले.
कावेरी विजय खाडे ( वय ४८ वर्षे,रा.संघवीनगर,भिगवण रोड, बारामती) असे महिला कर्मचाऱ्यााचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक शीतल जानवे, पोलीस उपाधीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रेम वाघमारे, पोलीस हवालदार कैलास महामुनकर, वनिता गोरे, चंद्रकांत कदम यांनी ही कारवाई केली. या संदर्भात हनुमंत अनिल मदने (वय ३३ वर्षे, व्यवसाय रा.भांडगाव, ता. इंदापूर) या शेतकऱ्याने तक्रार केली होती.
या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, भांडगाव येथील सामाईक गट नं. ३५१ मध्ये मदने यांच्या वडीलांच्या नावे असणाऱ्या ३९ गुंठे क्षेत्रात ये जा करण्यासाठी रस्ता नसल्याने त्यांच्या वडीलांनी मा. २७ जानेवारी २०२० रोजी इंदापूरच्या तहसीलदारांकडे रस्ता मागणीसाठी अर्ज केला होता. त्याची सुनावणी होवून मदने यांच्या वडीलांच्या बाजूने निकाल लागला. काही दिवसांनी प्रतिवादी अशोक शंकर मदने हे मयत झाल्यानंतर त्यांच्या वारसांनी त्या निकालाच्या विरोधात बारामतीच्या प्रांतांधिका-यांकडे अपिल दाखल केले. चौकशीअंती प्रांताधिका-यांनी निकाल रद्द केला. फेरचौकशी करिता ते प्रकरण त्यांनी इंदापूरच्या तहसीलदारांकडे पाठवले.त्याची सुनावणी पूर्ण झाली आहे.निकालाचा आदेश देणे बाकी आहे.
आदेश मिळण्याबाबत चौकशी करण्यासाठी २५ फेब्रुवारी रोजी मदने तहसील कार्यालयात गेले होते. त्यावेळी महसूल सहाय्यक वर्ग ३ विभागात काम करणाऱ्या कावेरी खाडे यांनी या प्रकरणाच्या निकालाची कादगपत्रे बनवून देण्याकरीता मदने यांच्याकडे स्वतःसाठी व साहेबांसाठी ३० हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र ही रक्कम देण्याची त्यांची इच्छा नसल्याने त्यांनी २७ फेब्रुवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे येथे जाऊन लेखी तक्रार दिली होती.
दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठ वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांनी तहसील कार्यालयाच्या परिसरात सापळा रचला. सायंकाळी पावणेपाच वाजता आरोपीस रंगेहाथ पकडले.
● आरोपी लाच मागत असल्याची पडताळणी करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदने यांना व्हाईस रेकॉर्डर चालू करुन देऊन पंच नितीन उत्तम जगताप यांच्याबरोबर आरोपीकडे पाठवले होते. तेथे झालेल्या तडजोडीच्या चर्चेत आरोपीने ३० हजार रुपयांऐवजी २५ हजार रुपये घेण्याची तयारी दाखवली.संबंधित महिला कर्मचाऱ्याने ज्यांच्या नावे लाच मागितली ते ‘साहेब’ कोण याची चर्चा सध्या सुरु आहे.●
● या पूर्वीचे दोन टर्म पूर्ण केलेले तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी रस्त्यांची अनेक प्रकरणे प्रलंबित ठेवली आहेत. त्याचा फटका अनेक शेतक-यांना बसला आहे. शेतात जाण्यासाठी, घराकडे जाण्यासाठी अनेकांना रस्ते नाहीत. सारी वहिवाट बंद आहे. त्यामुळे शेतक-यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. महसूल विभागाने या बिकट ‘अ’वहिवाटीच्या जाचातून सोडवणूक करावी अशी मागणी जोर धरत आहे.●
