साड्या नको विकास हवा म्हणत आमदारांकडून आलेल्या साड्या रस्त्यावर फेकल्या ; घोडकेवस्तीवरील संतप्त महिलांची कृती

इंदापूर : साड्यांचे आमीर दाखवून तुम्ही मते मागता आहात. विकास कुठे आहे अशी बिनतोड विचारणा करत कळंब गावच्या हद्दीतील महिलांनी आ. दत्तात्रय भरणे यांच्या मार्फत देण्यात आलेल्या साड्या रस्त्यांवर फेकून दिल्या. आम्हाला साड्या नको विकास हवा आहे अशी मागणी केली आहे.

मागील दोन आठवड्यापासून इंदापूर तालुक्यात गावागावातील प्रत्येक घरात आ.दत्तात्रय भरणे यांचे सस्मित छायाचित्र असणा-या पिशवीतील साड्यांचे वाटप करण्यात येत आहे. मतदारांच्या घरात किती महिला मतदार आहेत याची व्यवस्थित यादी करण्यात आली आहे.त्या यादीनुसार कार्यकर्त्यांच्या माध्यमातून साड्यांचे वाटप करण्यात येत आहे. वालचंदनगर नजीक असणा-या कळंब गाव व परिसरातील वाड्या वस्त्यांवर ही साड्या पोहोचवण्यात आल्या. घोडकेवस्तीवरील महिलांनी या साड्या घेण्यास स्पष्ट नकार दिला.

साड्यांचे आमीष दाखवून तुम्ही मते मागता. विकास कुठाय अशी थेट विचारणा या महिलांनी केली.घोडकेवस्तीवर वीज, पाणी, रस्ते यांची सुविधा नाही. घोडकेवस्तीवरुन पवारवस्तीकडे जाणा-या कच्च्या रस्त्यावरुन ये जा करणे अवघड होते.सायकलवरुन ये जा करणा-या शाळकरी मुलांच्या सायकली घसरतात. वीज द्यावी यासाठी तीन तीन वेळा सरपंचांना सांगितले,मात्र ते मागणीकडे काणाडोळा करत आहेत, अशा तक्रारी महिलांनी मांडल्या.तरुणांना नोक-या नाहीत या वस्तुस्थितीकडे ही लक्ष वेधले.

पासष्ट वर्षावरील महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ का मिळत नाही. त्या सरकारच्या सावत्र बहिणी आहेत का? असा सवाल एका वयोवृद्ध महिलेने विचारला.

कोट्यावधी रुपयांची विकास कामे आणल्याचे आ.दत्तात्रय भरणे यांचे दावे, विकास कामे घोडकेवस्तीपर्यंत पोहोचली नसल्याचे महिलांचे म्हणणे,६५ वर्षांवरील महिलांना लाडकी बहिण योजनेचा मिळत नसणारा लाभ या बाबींमुळे, महिलांना अत्यंत आवडती असणारी साडी फेकली जात आहे. त्या साड्यांबरोबर विद्यमान आमदारांचे छायाचित्र असणा-या पिशव्या अक्षरश: धूळ खात रस्त्यावर पडत आहेत, ही बाब लाडक्या बहिण योजनेचे विधानसभा निवडणुकीत कसे योगदान असेल हेच दाखवून देत असल्याची चर्चा होवू लागलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *