
इंदापूर : ट्रक व हायवा गाडीची धडक होवून ती दोन्ही वाहने पेटली.ट्रक जळून खाक झाला.हायवाचे ही मोठे नुकसान झाले. दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले.आज(दि. १३)सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास इंदापूर बारामती राज्य रस्त्यावर वेताळ मंदिराच्या अलिकडे ही घटना घडली.
अपघातग्रस्त ट्रक (आर जे ११ जी डी ०४३१) फलटण येथून डाळींब घेऊन इंदापूूरच्या डाळींब बाजारात निघाला होता. पलीकडून आलेल्या हायवा (क्र.एम एच ०४ सी यु ५९४४) ने ठोस दिल्याने अपघात घडला.त्यानंतर दोन्ही वाहने पेटली.हे दृष्य पाहिल्यानंतर रस्त्यावरुन जाणा-या लोकांनी दोन्ही चालकांना वाहनांमधून बाहेर काढले.नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाला पाचारण केले.घटनास्थळापासून केवळ एक किलोमीटर अंतरावर असणा-या नगरपरिषदेच्या पाण्याच्या टाकीच्या परिसरात असणा-या नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाची गाडी तब्बल अर्ध्या तासानंतर घटनास्थळावर आली.त्यांनी वाहनांना लागलेली आग विझवली.सामाजिक कार्यकर्ते रमेश शिंदे यांनी त्यांना सहकार्य केले.
● जखमी पैकी एक जणाला खाजगी वाहनातून तर दुस-याला रुग्णवाहिकेतून उपचारासाठी नेण्यात आले.दरम्यान अपघात घडल्यानंतर पाचारण केलेली १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका तेथे आल्यावर बंद पडली.अखेर पत्रकारांनी धक्के मारल्यानंतर ती कशीबशी सुरु झाली.ऐन घटकेला अशा तब्येत बिघडलेल्या रुग्णवाहिक पाठवल्या गेल्या तर गंभीर अवस्थेतील रुग्णाचे होणार कसे अशी चर्चा या प्रकारामुळे होवू लागली आहे.●
