इंदापूर : मलिदा गँग हटवून इंदापूर तालुक्याला वाचवण्याची आज गरज आहे, असे मत माजी जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांनी तालुक्यातील व्याहळी येथे बोलताना आज ( दि.१२) व्यक्त केले. अंकिता पाटील ठाकरे यांच्या जनसंवाद यात्रेचा शुभारंभ व्याहळी येथील भैरवनाथ मंदिरात नारळ फोडून करण्यात आला. त्या वेळी त्या बोलत होत्या. इंदापूर तालुक्यात पाच हजार पाचशे कोटी रुपये खर्चाची विकास कामे झाली आहेत असे सांगण्यात येते, मात्र विकास झाल्याचे लोकांना दिसत नाही. तर मग विकासाचा निधी गेला कुठे असा सवाल आपल्या शुभारंभपर भाषणात अंकिता पाटील ठाकरे यांनी उपस्थित केला.दूरदृष्टी नसलेल्या नेतृत्वाच्या अभावी गेल्या दहा वर्षांत तालुक्याचा सर्वांगीण विकास झाला नाही.बेरोजगार युवक,महिला यांच्या हाताला काम मिळवून देण्याचा प्रयत्न झाला नाही. मलिदा गॅंगच्या माध्यमातून केवळ ठराविक लोकांचा विकास झाला आहे.सर्वांगीण विकासाच्या कामांबाबत तालुका पिछाडीवर पडला आहे. निकृष्ट दर्जाची विकास कामे करणारी मलिदा गॅंग हटवून इंदापूर तालुक्याचा बचाव करण्याची गरज निर्माण झाली आहे, असे त्या म्हणाल्या. हर्षवर्धन पाटील यांच्या प्रयत्नातून लोणी देवकर येथे उभारण्यात आलेल्या पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत नवीन उद्योगधंदे आणावे लागतील.शेती, सिंचन,आरोग्य, शिक्षण या क्षेत्रातील विकासासाठी काम करावे लागेल, त्यासाठी हर्षवर्धन पाटील यांना विधिमंडळात पाठवण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला आहे.खा.सुप्रिया सुळे यांनी भक्कम साथ पाठीशी आहे. निवडणूकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांना साथ द्यावी,असे आवाहन त्यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे पुणे जिल्हाध्यक्ष सागर म्हणाले की, इंदापूरच्या सर्वांगीण विकासासाठी हर्षवर्धन पाटील यांच्यासारख्या अभ्यासू नेतृत्वाची गरज आहे.राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आणण्याकरिता व शरद पवार,खा.सुप्रिया सुळे यांचे हात अधिक मजबूत करण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांना विक्रमी मतांनी विधानसभेत बहुमताने पाठवण्याची जबाबदारी मतदारांनी पार पाडावी. व्याहळी विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष डी.के. गोळे यांनी प्रास्ताविक केले.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला तालुकाध्यक्षा छाया पडसळकर,ॲड.आशुतोष भोसले,राजेंद्र पवार, पै. कांतीलाल जाधव,अतुल वाघमोडे, पै.बबलू पठाण, विकास चितारे यांची या वेळी भाषणे झाली.वाल्मिकी शिंदे यांनी आभार मानले.विविध संस्थांचे पदाधिकारी, तरुण,महिला व ग्रामस्थ या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ●● इंदापूर शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांसह व ज्येष्ठ नेते दिवंगत शंकरराव पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केल्यानंतर अंकिता पाटील ठाकरे यांनी व्याहळीकडे प्रयाण केले.●●
