इंदापूर : कर्मवीरांच्या प्रत्येक जयंतीदिनी माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा घेण्याचा ठराव,तब्बल ४४ वर्षानंतर स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या १९७९-८० मध्ये दहावीच्या तुकडीत असणा-या माजी विद्यार्थ्यांनी केला.
या स्नेहमेळाव्यात रयतच्या कार्यात योगदान देणारे माजी विद्यार्थी व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल निवृत्त शिक्षकांना माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
आयएमएच्या डॉ.नितू मांडके सभागृहात हा स्नेहमेळावा संपन्न झाला.ज्येष्ठ शल्यचिकित्सक व माजी विद्यार्थी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.श्रेणिक शहा मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करुन स्नेहमेळाव्यास सुरुवात करण्यात आली.
अध्यक्षस्थानावरुन बोलताना डॉ.श्रेणिक शहा यांनी,रयत शिक्षण संस्थेच्या इंदापूरातील पत्र्याची खोली ते भव्य इमारतीपर्यंतच्या प्रवासाची माहिती दिली. रयतच्या सर्व वर्गाच्या माजी सक्रिय विद्यार्थ्यांची शिखर संघटना करण्याचे सूतोवाच त्यांनी केले.
बाळासाहेब सुर्वे,राहुल सवणे,जोहरा सय्यद,भारत शेलार, हसीना मुलाणी,अलका जामदार,सुधीर मखरे,प्रकाश सोनवणे, अरुणा गलांडे,जनार्दन क्षीरसागर, सादिक मोमीन यांच्यासह माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रा.अंकुश सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले.खंडेराव सोनवले याने सूत्रसंचालन केले.सुरेखा यादव शिरसट यांनी आभार प्रदर्शन केले.
लता जामदार, शालिनी जाधव उबाळे सुनील घुमटकर, गणेश मेनसे,मंगला घोडके,कांतीलाल आसबे,सुनील घुमटकर, दत्तात्रय सूळ यांच्यासह माजी विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
● सूर्यकांत कडू यांची हनुमान उडी,प्रतिकूल परिस्थितीवर मात करत विद्यार्थी ते मुंबई महानगरपालिकेचे करनिर्धारण व संकलक अधीक्षक असा प्रवास करणारे खंडेराव सोनवले,सात विविध शस्त्रक्रिया होऊन मृत्यूच्या दारातून परत आलेले कृष्णाजी कर्णे,राजेंद्र कांबळे रुकडीकर,साक्षी रुकडीकर यांच्यासह सर्वांनी केलेले नृत्य,अभिमन्यू भोंग यांची मिश्किली या बाबी स्नेहमेळाव्याच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरल्या. शाळेतील आठवणींना सर्वांनी दिलेल्या उजाळ्यामुळे कार्यक्रमाची गोडी उत्तरोत्तर वाढत गेली.●
● डॉ.श्रेणिक शहा,डॉ.एल.एस.कदम यांना ‘कर्मवीर भाऊराव पाटील समाजसेवा पुरस्कार’ देवून गौरविण्यात आले. तत्कालीन शिक्षक कृष्णाजी कर्णे,शकुंतला गाडेकर यांना ‘कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श गुरुजन पुरस्कार’ देण्यात आले. डॉ.संदेश शहा,सेवानिवृत्त विभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब सुर्वे,सेवानिवृत शिक्षिका सुरेखा यादव,जोहरा सय्यद यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.
●’ कर्मवीरांच्या विचारामुळे आम्ही आयुष्यात यशस्वी झालो.त्यांच्या नावाने मिळालेल्या पुरस्कारामुळे जबाबदारी वाढली आहे. कर्मवीरांच्या विचार संवर्धन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील’, अशी प्रतिक्रिया पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ.एल.एस.कदम यांनी व्यक्त केली●

